छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कपड्याला लावायची पिन तोंडात धरलेली असताना अचानक ठसका लागल्याने १८ वर्षीय तरुणीच्या श्वासनलिकेत अडकली. तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अडकलेली पिन काढून तरुणीचा जीव वाचवला.
कपड्याला लावण्यात येणारी पिन १८ वर्षीय तरुणीने तोंडात धरली होती. याच वेळी तिला जोराचा ठसका लागला आणि यात ती पिन थेट श्वासनलिकेत अडकली. ती निघून जाईल या समजातून तरुणी रुग्णालयात गेली नाही. परंतु, शनिवारी त्रास सुरू झाल्याने तरुणी घाटी रुग्णालयात दाखल झाली. ईएनटी व भूलतज्ज्ञांच्या संयुक्त पथकाने तातडीने ब्रॉन्कोस्कोपी करून काही मिनिटांत पिन काढली. अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेश निकम, डॉ. सुनील देशमुख, डॉ. प्रशांत केचे, डॉ. सोनाली जटाळे, निवासी डॉ. ओजस कुलकर्णी, भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. अमोल गवई, डॉ. प्रत्युशा, डॉ. ओमप्रकाश, डॉ. विद्या लावंड, सिस्टर अश्विनी झेंडे, ब्रदर राहुल शिंदे आदींनी सहकार्य केले.














